Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३०

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३०


गौरवीने माधवला माफ केलं…
पण ते माफ करणं दुर्बलतेतून नव्हतं, तर समजुतीतून होतं...
आणि तिथूनच त्यांच्या नात्याची एक नवी सुरुवात झाली...
कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही घोषणा नाही… फक्त हळूच जवळ येणारी मैत्री...

कॉलेजचे दिवस भरभर जाऊ लागले...
लेक्चर, असाइनमेंट्स, कॅन्टीनमधल्या चहाच्या कपांबरोबर
गौरवी आणि माधव एकमेकांच्या आयुष्यात नकळत सामील होत गेले...

कधी नोट्स शेअर करताना..., कधी ग्रुप प्रेझेंटेशनच्या निमित्ताने..., तर कधी फक्त कॉरिडॉरमधून जाताना एकमेकांकडे एक नजर, एक हलकं हसू असायचं…

माधव आता तिला घाबरवत नव्हता..., किंवा तिच्या पुढे उभा राहत नव्हता..., तर तो तिच्या बाजूला चालायला शिकत होता...

आणि गौरवी…
ती आता त्याच्याकडे संशयाने पाहत नव्हती..., तर पूर्णपणे विश्वासाने त्याच्याशी एकरूप होत होती... पण तिचं मन मात्र कुठेतरी अजून सावध होतं…
पण हृदय मात्र नकळत त्याच्याकडे झुकायला लागलं होतं...

दोघांनाही कळत होतं… कि हि फक्त मैत्री राहिलेली नाही...
पण दोघेही ते शब्दांत आणण्याचं धाडस करत नव्हते...

कदाचित दोघांनाही भीती होती... कारण नातं बदललं तर मैत्री हरवेल याची...

एक संध्याकाळ अशीच…
कॉलेज सुटल्यावर सगळे आपापल्या वाटेने निघाले होते...
आभाळावर गुलाबी संध्याछटा पसरल्या होत्या...

माधव गौरवीसोबत चालत होता… थोडा अस्वस्थ, थोडा विचारात...

चालता चालता क्षणभर थांबून तो म्हणाला...
“गौरवी… आज संध्याकाळी वेळ आहे का तुझ्याकडे…?”

ती थोडी दचकते...
“का…?”  तिने सहज विचारलं...

माधवने नजरेत नजर न घालता, हलकंसं हसत म्हटलं...
“जवळच एक छोटंसं कॅफे आहे… फक्त चहा किंवा कॉफी…
कॉलेजच्या बाहेर… थोडा वेळ बोलायला…”
त्याचा आवाज शांत होता, पण आत कुठेतरी धडधड होती...

पण गौरवी काही क्षण गप्प राहिली...
तिच्या मनात प्रश्न, आठवणी, सावधपणा… सगळं एकत्र आलं...
आणि मग ती हळू आवाजात म्हणाली...
“कॉफी चालेल…”

माधव पहिल्यांदाच इतका मोकळा हसला...,
आणि त्या एका साध्या “कॉफी चालेल” मध्ये दोघांच्या न बोललेल्या प्रेमाने पहिलं पाऊल टाकलं होतं…

माधवने बाईकची किल्ली फिरवली…
इंजिनचा हलका आवाज संध्याकाळच्या शांततेत मिसळला...

तो क्षणभर थांबला..., आणि त्याने नकळत मागे वळून गौरवीकडे पाहिलं…

ती उभी होती...  डोळे थोडेसे खाली..., ओठांवर न बोललेली लाज..., आणि मनात हलकीशी धडधड...
क्षणभर तिचे पाय पुढे सरकलेच नाहीत… जणू हा तो क्षण होता
जिथे मैत्री आणि काहीतरी अजून यांच्यातली सीमारेषा धूसर होत होती...

मग ती हळूच पुढे आली… अतिशय संकोचून..., सावधपणे
माधवच्या मागे बाईकवर बसली...

आता दोन्ही हात कुठे ठेवावेत हे तिचं तिलाच कळेना...
तीला त्याच्या खांद्याला स्पर्श व्हायची भीती..., आणि अंतर ठेवण्याची घाई… अश्या दोन्ही भावना एकाच वेळी तिच्यात निर्माण झाली होती...

माधवही ते जाणवत होता...  त्याने काही न बोलता
थोडंसं पुढे सरकून तिला थोडी जागा दिली... तेही आदराने, हक्क न गाजवता...

बाईक हळूच पुढे सरकली… रस्त्याच्या दिव्यांतून..., संध्याकाळच्या वाऱ्यातून...

गौरवीच्या मनात एकच विचार घोळत होता... कि हे फक्त बाईकवरचं बसणं नाही… तर ही विश्वासाची, सुरक्षिततेची,
आणि नकळत उमलणाऱ्या भावनेची सुरुवात आहे…
आणि माधव…
तो फक्त समोरचा रस्ता पाहत होता.., पण मन मात्र
मागे बसलेल्या त्या शांत अस्तित्वाकडे पहिल्यांदाच इतकं जागं झालं होतं…


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all